Sunday, June 30, 2013

तितीर्षु: दुस्तरं मोहात् आणि उद्बाहुरिव वामन:|


मध्यंतरी एका याहू ग्रूपावर "तितीर्षु: दुस्तरं मोहात् (पाठभेद - स्नेहात्) उडुपेनास्मि सागरम् ||" या ओळींचा अर्थ काय अशी पृच्छा झाली होती. मूळ श्लोक असा आहे -
क्व सूर्यप्रभवो वंश: क्व चाल्पविषया मति: |
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम् || - (रघुवंश: सर्ग १, श्लोक २ )

[The (exalted) race sprung from the sun, and my intellect
of limited scope (to describe it),—how unequal the two! It is
under a delusion that I am desirous of crossing, by means of a raft,
the ocean, so difficult to be crossed.]

रघुवंशातला हा दुसरा श्लोक आहे. रघुवंश ही कालिदासाने इक्ष्वाकू वंशाला दिलेली काव्यरूपी मानवंदना म्हणता येईल. या कुळातील देदीप्यमान राजांच्या कहाण्या हा या महाकाव्याचा विषय आहे. तेव्हा विषयप्रवेश करताना वरील श्लोक येतो. याचा सरळसोट अर्थ काहीसा असा होईल -
कोठे हा (काव्याचा विषय असलेला) सूर्यवंश (आणि त्याचा भव्य विस्तार वगैरे) अन कोठे माझी अल्पमती (जी या इतिहासास शब्दात पकडू पाहत आहे),
हे म्हणजे (मी) अथांग पसरलेला समुद्र एखाद्या होडक्यात बसून पार करण्याचा मोह धरण्यासारखं आहे.
कालिदासाची शब्दरचना अत्यंत अचूक असते असं आमच्या संस्कृतच्या प्राध्यापकांकडून वारंवार ऐकलं होतं. तेव्हा सहज प्रश्न पडला की कालिदासाने 'मोहात् (किंवा स्नेहात्)' असा शब्द का वापरला? वरवर पाहता कवी आपल्यासमोरील उत्तुंग आव्हानाचे वर्णन करीत आपल्या बुद्धीच्या मर्यादा स्पष्ट करीत आहे असे दिसते, पण थोडं बारकाईने पाहिलं तर यात कवीचा दुर्दम्य आत्मविश्वासही दिसतो. त्याने दिलेली उपमाच पहा ना - होडक्यातून समुद्र पार करणे हे 'येरागबाळ्याचे काम नोहे'! आजच्या घडीलाही असे लोक आपण पाहतोच की..(उदा. कमांडर दिलीप दोंदे - http://sagarparikrama.blogspot.com/) तद्वतच कवीला हा आंतरिक विश्वास आहे की तो हा रघुवंशरुपी सागर तरुन जाईल. (तितीर्षु - अर्थात तरण्याची इच्छा धरणारा) किंबहुना हा सागर तरुन जाण्याच्या मोहापायी/स्नेहापायी (सोप्या मराठीत, थ्रिल) त्याने हा संकल्प धरला आहे. रघुच्या वंशाची कीर्ती कालिदासाच्या आधीही दुमदुमत होती. पण तिला शब्दात पकडण्याचा प्रयत्न तोपर्यंत झाला नव्हता. कालिदासाला हा मोह झाला, आणि आपल्याला हे महाकाव्य मिळाले!
आता हा पुढचाच श्लोक पहा -
मन्द: कवियश:प्रार्थी गमिष्याम्युपहास्यताम् |
प्रांशुलभ्ये फ़ले लोभादुद्बाहुरिव वामन: || - (रघुवंश: सर्ग १, श्लोक ३ )

[Dull (of intellect) and yet aspiring after a poet's fame, I
shall expose myself to ridicule, like a dwarf, who, through
greed, uplifts his hands for a fruit accessible (only) to the tall.]

सरळ अर्थ -
(जसा) केवळ उंच लोकांना उपलब्ध असणारी फळे एखादा बुटका माणूस (केवळ) हात उंचावून मिळवू पाहतो, (तसा) साधारण वकुबाचा असूनही प्रसिद्धीची इच्छा धरणारा असा मी (हे काव्य लिहून) स्वत:चे हसे करुन घेणार आहे.
पुन्हा एकदा कवी स्वत:च्या क्षमतांची खिल्ली उडवताना दिसतो, पण उभ्या जगात बुटक्या माणसास खंडीभर शब्द उपलब्ध असताना त्याने वापरलेला शब्द - 'वामन'!
(बहुदा मल्लिनाथाच्या मते) या योजनेमागे कवीचा असीम आशावाद दिसतो - वामनाची गोष्ट आठवा जरा, दोन पावलांत अख्खे जग व्यापलेन् की त्याने, तसाच कवी हे शिवधनुष्य (लीलया) पेलणार आहे असा याचा ध्वन्यार्थ!

(पूर्वप्रकाशित)

Monday, June 10, 2013

बहुगुणरमणीय..



पावसाळ्याबद्दल सारेच लिहितात, सार्‍या वयाचे, सार्‍या पेशाचे! साहित्यिकांचा फार आवडता आहे तो; कारण तो वेगळा आहे – बहुगुणरमणीय!
पण सूक्ष्मपणानं त्याच्याकडे कोणी बघतच नाही.
जगातल्या सगळ्या द्वंद्वांप्रमाणे ‘शीतोष्ण’ हेही एक प्रसिद्ध द्वंद्‍व आहे. भूगोलाच्या काटेकोर नियमांमुळे सहा-सहा महिने पृथ्वीला हे द्वंद्‍व सहन करावं लागतं. या द्वंद्वाला धूप न घालता त्यांच्या पार जाऊन आपलं अस्तित्त्व दाखवणारा म्हणून पावसाळा वेगळा!!
गंमत अशी की उन्हाळा, हिवाळा अध्याह्रत धरले तरी पावसाळा हा ‘बनवलेला’ की ‘स्वयंभू’ असा प्रश्न पडावा. मुळातच तीन ढोबळ ऋतू मानणं ही केवळ सोय आहे. पंचेंद्रिये जागृत असणार्‍याला रोजचा दिवस नवा असतो; नवा ऋतू, त्याच्या छटा, त्याची हवा, रंग-ढंग निरनिराळे भासतात.
हेच बघा ना, २२ डिसेंबरला सर्वात मोठी रात्र उलटली की अधिकृतपणे दिवस मोठा व्हायला लागतो पण थंडीचा कडाका तेव्हाच जोरदारपणे जाणवतो. अशाच थंडीच्या परोक्ष हळूच उन्हाळा आपली चाहूल देतो ती तिळगूळ आणि मकरसंक्रांतीतून, पुढे येणारी होळी उघडउघड अंगावर गार पाणी ओतते – जणू पुढल्या ज्वाळांची चुणूक त्यांना आधीच लागली असावी..
वसंतातलं सदाबहार ऊन नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याच्या पहिल्यावहिल्या दिवसांसारखं असतं – सरत्या काळाबरोबर आपला तडाखा ते कधी वाढवतं, काही पत्ता लागत नाही! :)  २१ जूनपर्यंत ही ससेहोलपट मोठ्या गंमतीनं निसर्ग पाहतो आणि सूर्याला दक्षिणायनात पिटाळतो – पुन्हा मघासारखंच – दिवस अधिकृतपणे लहान व्हायला लागला तरी वैशाखवणव्याच्या झळा एव्हानाच जास्त बसतात. मग येणारी थंडी मात्र पावसाच्या मर्जीने येते..
पावसाचं राज्य सुरु असताना मात्र हे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण अन् भाद्रपद एका वेगळयाच दुनियेला आंदण दिल्यासारखे असतात. चातुर्मास – देवशयनी ते उत्थापिनी! देवही निर्धास्तपणे झोपू शकतो असे चार महिने!!
देव नसतो, तर चार महिने सृष्टी सांभाळतो कोण? – अर्थात पाऊस! पाऊस सरल्यानंतर मग शरदातलं ऊनच काय, चांदणंही लोक जागून काढतात..या उन्हाचा विशेष सांगायचा तर ‘उनपावसाचे’ तडाखे खाऊन परिपक्व बनलेलं ऊन असतं हे..
सरत्या पावसानंतर येणार्‍या थंडीबरोबर कालक्रमणा चालू लागते ती अंतिम वाटेकडे – २१ डिसेंबर – चक्र पूर्ण होतं – जुनं पाणी वाहून जातं – नवे धुमारे फुटू लागतात..जीवन यापेक्षा वेगळं असतं काय?
पण तरी पावसाळ्याचा प्रश्न भिजत पडलाच की..(गंमत पहा, प्रश्न नेहमी ‘भिजत’ पडतो, तापत किंवा कुडकुडत नाही :) या भिजण्यात – या सातत्यात बहुदा पावसाचं इंगित सामावलेलं असावं) जरा निराळ्या पद्धतीनं हे मांडून बघू आणि थांबू..
सुख-दु:खांचं, ऊन-थंडीचं चक्र आपल्याला नवं नाही; दु:खानंतर येणारं सुख सगळ्यांनाच हवं असतं, किंबहुना ते भावतं-साजरं केलं जातं – रात्रीनंतर येणारी पहाट सूक्तांना जन्म देते तसे दु:खानंतर येणार्‍या सुखाचे गोडवे गायले जातात; पण सुखानंतर येणारं दु:ख मात्र सगळेच बघू शकत नाहीत.
ऋतूंचही असंच असावं – थंडीनंतरच्या उन्हाचं सगळेच स्वागत करतात पण उन्हानंतरच्या थंडीचा सामना थेट करावा लागू नये म्हणूनच की काय पावसानं आपली जागा या दोघांच्या मध्ये मुक्रर केली असावी!

(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र टाईम्स, संवाद पुरवणी, जुलै २००२)