Wednesday, March 11, 2015

दिल जरुर ‘चाहता’ है |



फरहान अख्तरचा ‘दिल चाहता है’ तसा म्हटला तर – stereotype - नेहमीचा वाटणारा हिंदी चित्रपट आहे, पण या माध्यमातून तो काही नेहमीचे, काही इतर प्रश्न, काही नवीन प्रश्न वेगळ्या प्रकारे मांडू पाहतो.
                तिघे मित्र – आकाश, सिद्धार्थ व समीर, वर्ग उच्च-उच्च मध्यमवर्ग (श्रीमंतच म्हणा ना) पण दोस्ती वर्ग, स्थलातीत. एकदम पक्के दोस्त. तीन तरहांचे तिघे. आकाश उर्फ आमिर खान – परफेक्शन – प्रेम-बिम झूट मानणारा- materialistic किंवा भौतिकवादी – प्रेम भावना वगैरे ‘झंझट’ असल्याने त्यात गुंतायचंच नाही अशी ठाम समजूत करुन घेतलेला.
       समीर (सैफ अली खान) सर्वात बावळट, दिसल्या मुलीवर भाळणारा (आणि फसणारा) दर दोन आठवड्यांनी भेटणारी नवीन मुलगी हेच आयुष्यातलं साध्य (?) वगैरे मानणारा.
       सिद्धार्थ (अक्षय खन्ना) चित्रकार आहे. एकदम ‘आऊट औफ द वर्ल्ड’. ‘आध्यात्मिक’ असा शिक्का मी मारु शकत नाही, पण त्याच्यात कलाकाराची संवेदनशीलता व निराळाच दृष्टीकोन पुरेपूर भरला आहे.
       तिघे प्रेमाचा अर्थ लावू पाहतात आणि या प्रकारात प्रेमाच्या निरनिराळ्या छटा व्यक्त होतात. या सगळ्यात नेहमीच ह्रदयापरिवर्तन, मैत्री दुभंगणं, पुन्हा सांधणं, जुळलेलं लग्न मोडणं, भावनाशील प्रसंग आदी सगळं आहे, पण तरीही मझा आहे.
       संयत अभिनय, दिग्दर्शकाची अधूनमधून दिसणारी चमक, चित्रपटाला न्याय देणारी गाणी व संगीत या आणखी काही जमेच्या बाजू.
       वाचण्यासारखं फक्त इतकंच. यातलं सगळं किंवा काही दिसेलच याची निश्चिती देत नाही, त्याकरता स्वत:च एकदा पहा.
(०५/१०/२००३)

Sunday, December 21, 2014

ऑप्शन्स, डेरिव्हेटिव वगैरे..



नुकतेच एका परिचितांशी बोलताना डेरिव्हेटिव, ऑप्शन्स वगैरेचा विषय निघाला. त्यांनी एका पुस्तकाची शिफारस केली. हे ते पुस्तक: http://www.amazon.com/Option-Trading-Your-Spare-Time/dp/1572487089  सगळं पुस्तक अजून वाचले नाही, पण त्यातील एक उदाहरण ऑप्शन्स ह्या विषयाची ओळख करुन देण्यास उत्तम आहे असे वाटले. तदर्थ हा लहानसा लेख:

कल्पना करा की तुमच्या मित्रास त्याचे घर विकायचे आहे. घराची किंमत सुमारे $१००,००० (अमेरिकन उदाहरण असल्याने एक लाख हे शंभर हजार असे लिहिले आहेत.) इतकी अपेक्षित आहे. तुम्हाला हे घर विकत घ्यायला आवडेल पण तुमच्यापाशी आत्ता एवढे पैसे नाहीत. तुम्ही मित्रासमोर पुढील प्रस्ताव ठेवता:
मी आत्ता हे घर विकत घेऊ शकत नाही, पण जर तू मला कागदावर असं लिहून दिलंस की, ‘मी (किंवा हा प्रस्ताव/ठराव घेऊन येणारा) तुझे घर पुढल्या १२ महिन्यात केव्हाही $१००,००० ला विकत घेऊ शकतोतर मी तुला त्यापोटी जास्तीचे $१०,००० देईन.”
समजा तुमच्या मित्रास घर विकायची तितकीशी निकड नाही. त्यामुळे तो या प्रस्तावास राजी होतो आणि तुम्ही त्यास $१०,००० देता. हा प्रस्ताव/ठराव एका प्रकारचाऑप्शनआहे. यामुळे तुम्हाला पुढील १२ महिन्यांत ते घर विकत घेण्याची मोकळीक (पण बंधन नाही) मिळाली आहे.
समजा पुढील सहा महिन्यांत त्या घराच्या आसपास एक नवीन मॉल बांधण्यास सुरुवात होते. परिणामत:, सगळ्या घरांच्या किंमती (आणि त्यांची मागणी) वाढू लागतात आणि आपल्या गोष्टीतील घराची किंमत आता $१२०,००० वर पोचते. साहजिकच तुमच्याकडील तो प्रस्तावाचा खर्डा तुम्ही त्या घराच्या नवीन इच्छुकांसमोर फडकवता आणि त्यांना सांगता की, “मी तुम्हांला हा प्रस्ताव $१५,००० ला विकेन, जेणेकरुन तुम्ही हे घर पुढील सहा महिन्यांत अवघ्या $१००,००० मध्ये विकत घेऊ शकाल.”
त्यातला कोणीतरी यास राजी होतो आणि तो ठराव तुमच्याकडून $१५,०००स विकत घेऊन ते घर तुमच्या मित्राकडून $१००,०००स विकत घेतो. या सगळ्या प्रक्रियेअंती काय घडलं ते पाहू या:
     तुमच्या मित्रास वायद्याप्रमाणे घराचे $१००,००० अधिक $१०,००० मिळाले.
     घराच्या नवीन मालकास ते $१२०,००० चे घर $११५,००० मध्ये मिळाले ($१००,००० घराची किंमत अधिक $१५,००० ठरावाची किंमत)
     तुमचा फायदा वट्ट $,००० ($१५,००० वजा $१०,०००)
     महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही अवघ्या सहा महिन्यांत केवळ $१०,००० च्या गुंतवणुकीवर $,००० चा परतावा (म्हणजे ५०%!) मिळवलात.
     त्याहून महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला $१००,००० ची वस्तू विकायचा/विकत घ्यायची मोकळीक केवळ एक-दशांश किंमतीत मिळाली.

याच न्यायाने ऑप्शन्स ट्रेडिंगमधील आधारभूत मत्ता (asset) म्हणजे एखाद्या कंपनीचे समभाग असतात. दोन तर्‍हांचे ऑप्शन्स (कॉल आणि पुट) आपल्याला ते समभाग अमुक एका किंमतीस (अनुक्रमे) विकत घेण्याची किंवा विकायची मोकळीक देतात. त्याबद्दल पुढल्या लेखात पाहू.