Friday, July 24, 2009

द फाउंटनहेड

द फाउंटनहेड

जग चालतं ते दोन प्रकारच्या माणसांनी. स्वयंस्फूर्त आणि परोपजीवी. जगाबद्दलचं हे वैयक्तिक निरीक्षण अगदी नेमक्या शब्दात मांडणारं पुस्तक म्हणजे आयन रँडचे (Ayn Rand) द फाउंटनहेड (The Fountainhead)!
Objectiveness व Individualism ची गंगोत्री मानल्या जाणाऱ्या या पुस्तकाचे जगभर लाखो चाहते आहेत. मला स्वतःला लेखिकेने मांडलेल्या काही संकल्पना पटल्या, माझ्या काही मतांना तिने दुजोरा दिला.
'फाउंटनहेड' चा अर्थ स्रोत, मूळ, source! जग बहुतांशी Second-Rate, म्हणजे परोपजीवी लोकांनी बनलेलं असतं. जगताना स्वतःच्या आत डोकावून मन सांगेल तसं (मनमानीपणे नव्हे) वागण्याचा प्रयत्न हाताच्या बोटावर मोजता येतील इतके लोक करतात. या स्रोताकडे बघण्याची सगळ्यांची हिंमत होत नाही. कारण ते अवघड असतं, त्रासदायक, कष्टदायी असतं. सर्वसाधारणपणे माणसाला frictionless - path of least resistance हवा असतो, आयतं मिळालेलं हवं असतं, स्वतःला कष्ट पडले नाहीत म्हणजे वाट्टेल ते स्वीकारायची तयारी असते. त्यामुळे प्रत्यक्ष कृतीचा - वैचारिक वा इतर- मक्ता दुसऱ्यांवर सोपवून माणसे आंधळेपणाने आयुष्य जगत असतात.
या कादंबरीचा नायक- Howard Roark- याचा लढा अशा मनोवृत्तीशी आहे. शिक्षणाने व पेशाने तो architect आहे, पण साचलेल्या, गतानुगतिक विद्येत त्याला काडीमात्र रस नाही. आपली वेगळी वाट चोखाळण्याकरिता लागणारी जिद्द त्याच्याकडे आहे. वाट पाहायची सहनशीलता आहे आणि त्याहून मोठी - जगाकडे पाहण्याची objective दृष्टी आहे. इथे कदाचित तो आदर्शवादी बनतो पण तो जे सांगतो त्यात अशक्य असं काहीच नाही.
उदाहरणार्थ गरीबांकरता कमी खर्चात गृहसंकुल बांधायची योजना तो हाती घेतो ती 'सामाजिक बांधिलकी' किंवा 'सामाजिक ऋण' म्हणून नव्हे तर त्याच्या कामातला तो एक आव्हानात्मक प्रश्न वाटतो म्हणून! गरीबांना त्याचा फायदा झाला तर त्याचं त्याला सोयरसुतक नाही, त्याच्या दृष्टीने त्याने एक आव्हानात्मक प्रश्न आपल्या बुद्धीच्या, हिंमतीच्या बळावर सोडवला इतकंच समाधान!

No comments:

Post a Comment