Monday, June 20, 2011

(घुसमटलेला) श्वास !

लिखित कृतीचं श्रेष्ठत्त्व वेगळ्या प्रकारे प्रस्थापित होतं ते असं. मी माधवी घारपुरेंची मूळ कथा वाचली नाही पण तिच्यातला पीळ मात्र जाणवण्यासारखा आहे. किंबहुना 'श्वास'ला मिळालेली आजवरची मान्यता ही या कथाबीजाच्या सामर्थ्यावरच आहे असं मला वाटतं. एक चित्रपट म्हणून ते बीज विस्तारून मांडण्यात त्याला बहुतांशी अपयश आलं आहे!
'प्रचंड प्रसिद्धी मिळाल्याने टीका करतोय' असं वाटू नये याची मी माझ्याकडून काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे पण (माझ्या मते ) मासला काहीसा असा आहे: 
दोन-तीन ठळक घटना या कथेच्या केंद्रस्थानी आहेत. 

१. एका सात-आठ वर्षांच्या मुलास  डोळ्यांच्या कर्करोगामुळे जीव वाचवायचा असेल तर जन्मभर आंधळे राहायचा पर्याय - त्याच्या आजोबांची यावर प्रतिक्रिया..
२. त्या मुलास याची जाणीव करून देणे 
३. जग कायमचं अंधारण्याआधी त्याच्या सुंदरतेचं ओझरतंच का होईना पण एक चित्र त्या मुलासमोर उभं करणं 
संदीप सावंतानी या तीन मुद्द्यांना विषम प्रकारे हाताळलं आहे. पहिल्या घटनेस चिकार वेळ लावून दुसरीस त्याहून कमी व तिसरीस अगदीच कमी वेळ दिला आहे.
घटना घडतात .. पण त्यांच्यात एकसंधता - सातत्य रहात नाही कोकणातील अप्रतिम छायाचित्रण पण यामुळेच त्याची संगती व प्रयोजन कळत नाही. नलावडे flashback मध्ये पाहत आहेत तर तसंही स्पष्ट नाही.
अमृता सुभाष बऱ्याच अंशी उथळ व गरज नसलेलं पात्र . गोंधळलेल्या आजोबांच्या मदतीला योगायोगाने धावून आलेली एक मुलगी असंही तिला सादर करता आलं असतं पण मेडिकल सोशल वर्करचं कंकण हाती बांधल्याने तिच्या व्यक्तिरेखेतील मजा निघून जाते. 
डॉक्टरांची व्यक्तिरेखा ही देखील अशीच अनाठायी - झुकतं माप दिलेली वाटते..पर्शाशी बोलण्याकरता अमृता डॉक्टरांचा इतका पिच्छा का पुरवते ते कळत नाही, कारण त्याने साध्य होतं ते काही एवढं 'ग्रेट' नसतं.
नलावडे आपल्या व्यक्तिरेखेत जरा जास्तच शिरतात . जास्त अशाकरता की त्यामुळे बाजूच्या व्यक्तिरेखा बोथट होतात.
नातवाचं अटळ निदान कळल्यावर त्यांच्या जीवाची होणारी घालमेल हाही एक हळवा क्षण आहे पण त्यास पुरेसा न्याय मिळाल्यासारखे वाटत नाही.
लिखित माध्यमात ओळींच्या मध्ये, परिच्छेदांच्या मध्ये, रिकामं अवकाश असतं. वाचक ते आपल्या मनाप्रमाणं भरून काढतो. पण दृक-श्राव्य माध्यमात या अवकाशाला भरायची जबाबदारी दिग्दर्शकावर असते, ते योग्य भरलं न गेल्यास अवस्था वरील प्रमाणे होते..
तस्मात, ऑस्कर मिळायची 'शून्य' शक्यता आहे..मिळालंच तर ती पुण्याई कथेची आहे, चित्रमाध्यमाला सुधारायला प्रचंड वाव आहे!

(टीप: सदर लेख त्या वर्षीचे  ऑस्कर पुरस्कार जाहीर होण्याआधी लिहिलेला आहे)

No comments:

Post a Comment