पावसाळ्याबद्दल सारेच
लिहितात, सार्या वयाचे, सार्या पेशाचे! साहित्यिकांचा फार आवडता आहे तो; कारण तो
वेगळा आहे – बहुगुणरमणीय!
पण सूक्ष्मपणानं
त्याच्याकडे कोणी बघतच नाही.
जगातल्या सगळ्या
द्वंद्वांप्रमाणे ‘शीतोष्ण’ हेही एक प्रसिद्ध द्वंद्व आहे. भूगोलाच्या काटेकोर
नियमांमुळे सहा-सहा महिने पृथ्वीला हे द्वंद्व सहन करावं लागतं. या द्वंद्वाला
धूप न घालता त्यांच्या पार जाऊन आपलं अस्तित्त्व दाखवणारा म्हणून पावसाळा वेगळा!!
गंमत अशी की उन्हाळा,
हिवाळा अध्याह्रत धरले तरी पावसाळा हा ‘बनवलेला’ की ‘स्वयंभू’ असा प्रश्न पडावा.
मुळातच तीन ढोबळ ऋतू मानणं ही केवळ सोय आहे. पंचेंद्रिये जागृत असणार्याला रोजचा
दिवस नवा असतो; नवा ऋतू, त्याच्या छटा, त्याची हवा, रंग-ढंग निरनिराळे भासतात.
हेच बघा ना, २२ डिसेंबरला
सर्वात मोठी रात्र उलटली की अधिकृतपणे दिवस मोठा व्हायला लागतो पण थंडीचा कडाका
तेव्हाच जोरदारपणे जाणवतो. अशाच थंडीच्या परोक्ष हळूच उन्हाळा आपली चाहूल देतो ती
तिळगूळ आणि मकरसंक्रांतीतून, पुढे येणारी होळी उघडउघड अंगावर गार पाणी ओतते – जणू
पुढल्या ज्वाळांची चुणूक त्यांना आधीच लागली असावी..
वसंतातलं सदाबहार ऊन
नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्याच्या पहिल्यावहिल्या दिवसांसारखं असतं – सरत्या
काळाबरोबर आपला तडाखा ते कधी वाढवतं, काही पत्ता लागत नाही! :) २१ जूनपर्यंत ही
ससेहोलपट मोठ्या गंमतीनं निसर्ग पाहतो आणि सूर्याला दक्षिणायनात पिटाळतो – पुन्हा
मघासारखंच – दिवस अधिकृतपणे लहान व्हायला लागला तरी वैशाखवणव्याच्या झळा एव्हानाच
जास्त बसतात. मग येणारी थंडी मात्र पावसाच्या मर्जीने येते..
पावसाचं राज्य सुरु असताना
मात्र हे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण अन् भाद्रपद एका वेगळयाच दुनियेला आंदण
दिल्यासारखे असतात. चातुर्मास – देवशयनी ते उत्थापिनी! देवही निर्धास्तपणे झोपू
शकतो असे चार महिने!!
देव नसतो, तर चार महिने
सृष्टी सांभाळतो कोण? – अर्थात पाऊस! पाऊस सरल्यानंतर मग शरदातलं ऊनच काय,
चांदणंही लोक जागून काढतात..या उन्हाचा विशेष सांगायचा तर ‘उनपावसाचे’ तडाखे खाऊन
परिपक्व बनलेलं ऊन असतं हे..
सरत्या पावसानंतर येणार्या
थंडीबरोबर कालक्रमणा चालू लागते ती अंतिम वाटेकडे – २१ डिसेंबर – चक्र पूर्ण होतं –
जुनं पाणी वाहून जातं – नवे धुमारे फुटू लागतात..जीवन यापेक्षा वेगळं असतं काय?
पण तरी पावसाळ्याचा प्रश्न
भिजत पडलाच की..(गंमत पहा, प्रश्न नेहमी ‘भिजत’ पडतो, तापत किंवा कुडकुडत नाही :) या भिजण्यात – या सातत्यात बहुदा पावसाचं इंगित सामावलेलं
असावं) जरा निराळ्या पद्धतीनं हे मांडून बघू आणि थांबू..
सुख-दु:खांचं, ऊन-थंडीचं
चक्र आपल्याला नवं नाही; दु:खानंतर येणारं सुख सगळ्यांनाच हवं असतं, किंबहुना ते
भावतं-साजरं केलं जातं – रात्रीनंतर येणारी पहाट सूक्तांना जन्म देते तसे दु:खानंतर
येणार्या सुखाचे गोडवे गायले जातात; पण सुखानंतर येणारं दु:ख मात्र सगळेच बघू शकत
नाहीत.
ऋतूंचही असंच असावं –
थंडीनंतरच्या उन्हाचं सगळेच स्वागत करतात पण उन्हानंतरच्या थंडीचा सामना थेट करावा
लागू नये म्हणूनच की काय पावसानं आपली जागा या दोघांच्या मध्ये मुक्रर केली असावी!
(पूर्वप्रसिद्धी: महाराष्ट्र
टाईम्स, संवाद पुरवणी, जुलै २००२)
Gr8 observations Chintamani,a pleasant write- up,'Bahugunramaneey' is a very versatile and abosolutely lovely title.
ReplyDelete-Reminds one that Rainy season has the elements of heat and cold combined in a rhythmic sense.
Simple fact-Rains are us creatures, we don't exit without this only nectar we know!
Thanks Bharati Tai.
ReplyDelete