कल्पना करा की तुमच्या मित्रास त्याचे घर विकायचे आहे. घराची किंमत सुमारे $१००,००० (अमेरिकन उदाहरण असल्याने एक लाख हे शंभर हजार असे लिहिले आहेत.) इतकी अपेक्षित आहे. तुम्हाला हे घर विकत घ्यायला आवडेल पण तुमच्यापाशी आत्ता एवढे पैसे नाहीत. तुम्ही मित्रासमोर पुढील प्रस्ताव ठेवता:
“मी आत्ता हे घर विकत घेऊ शकत नाही, पण जर तू मला कागदावर असं लिहून दिलंस की, ‘मी (किंवा हा प्रस्ताव/ठराव घेऊन येणारा) तुझे घर पुढल्या १२ महिन्यात केव्हाही $१००,००० ला विकत घेऊ शकतो’ तर मी तुला त्यापोटी जास्तीचे $१०,००० देईन.”
समजा तुमच्या मित्रास घर विकायची तितकीशी निकड नाही. त्यामुळे तो या प्रस्तावास राजी होतो आणि तुम्ही त्यास $१०,००० देता. हा प्रस्ताव/ठराव एका प्रकारचा ‘ऑप्शन’ आहे. यामुळे तुम्हाला पुढील १२ महिन्यांत ते घर विकत घेण्याची मोकळीक (पण बंधन नाही) मिळाली आहे.
समजा पुढील सहा महिन्यांत त्या घराच्या आसपास एक नवीन मॉल बांधण्यास सुरुवात होते. परिणामत:, सगळ्या घरांच्या किंमती (आणि त्यांची मागणी) वाढू लागतात आणि आपल्या गोष्टीतील घराची किंमत आता $१२०,००० वर पोचते. साहजिकच तुमच्याकडील तो प्रस्तावाचा खर्डा तुम्ही त्या घराच्या नवीन इच्छुकांसमोर फडकवता आणि त्यांना सांगता की, “मी तुम्हांला हा प्रस्ताव $१५,००० ला विकेन, जेणेकरुन तुम्ही हे घर पुढील सहा महिन्यांत अवघ्या $१००,००० मध्ये विकत घेऊ शकाल.”
त्यातला कोणीतरी यास राजी होतो आणि तो ठराव तुमच्याकडून
$१५,०००स विकत घेऊन ते घर तुमच्या मित्राकडून
$१००,०००स विकत घेतो. या सगळ्या प्रक्रियेअंती काय घडलं ते पाहू या:
● तुमच्या मित्रास वायद्याप्रमाणे घराचे $१००,००० अधिक $१०,००० मिळाले.
● घराच्या नवीन मालकास ते $१२०,००० चे घर $११५,००० मध्ये मिळाले ($१००,००० घराची किंमत अधिक $१५,००० ठरावाची किंमत)
● तुमचा फायदा वट्ट $५,००० ($१५,००० वजा $१०,०००)
● महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्ही अवघ्या सहा महिन्यांत केवळ $१०,००० च्या गुंतवणुकीवर $५,००० चा परतावा (म्हणजे ५०%!) मिळवलात.
●
त्याहून महत्त्वाचा भाग म्हणजे तुम्हाला $१००,००० ची वस्तू विकायचा/विकत घ्यायची मोकळीक केवळ एक-दशांश किंमतीत मिळाली.
No comments:
Post a Comment