Friday, July 16, 2010

जाता पंढरीसी ...

सहा वर्षापूर्वी (२००४) लेखक पंढरपूरच्या वारीस गेला होता, त्यावरील ही लेखमाला- आषाढी हे निमित्त..
पंढरपूरला जायचा निर्णय अचानक नव्हता. त्याबद्दल बरंच वाचलं, ऐकलं होतं. T.Y.B.A. झाल्यापासूनच जायचा मोका शोधत होतो, या वर्षी जमून आलं इतकंच. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मात्र बरंच मनोरंजन झालं - "सगळी घाण - चिकार गर्दी असते तिकडे, कशाला जातोस? "; " अरेरे! या वयात परमार्थाला लागला" पासून "प्रेमभंग वगैरे झाला का? " इथपर्यंत विचारणा झाल्या.
पहिल्याच वेळी एकदम २१ दिवस (संपूर्ण वारी) झेपेल की नाही याबद्दल साशंकता होती, शिवाय TATA MOTORS ची मुलाखतही होती. त्यामुळे फलटणला वारीत सामील व्हायचे ठरवले. फलटणपासून पुढे सहा दिवस - ११० कि. मी.
फलटणला बसमधून जातानाच विठोबाचा विचार चालू होता. उत्त्पत्ती - स्थिती - लय या त्रिकूटातील विठोबाची स्थितीशी जवळीक - विष्णूचा वारसदार - पालनकर्ता. पहिला धडा मिळाला की 'जीवनाला सामोरे जा' , मजेत जा - LIFE IS BEAUTIFUL! जीवन ही जगायची गोष्ट आहे.
थोडं 'ऍब्स्ट्रॅक्ट' झालं का? मला म्हणायचंय असं की, जी शक्ती पालनकर्ती आहे - जिला जग सांभाळायचं व चालवायचं आहे, तिचा बडिवार माजवल्याशिवाय तिच्यामागे कोण येईल? विठोबाची वर्णने वाचा - समृद्धी, ऐश्वर्य, आबादीआबाद !! कुठेही निराशेचं, नकारात्मक वर्णनाचं टिपूसही नाही [त्याचेच sister concern - खरं तर brother concern - तिरुपतीचे बालाजीपण तसेच - अक्षरशः सोन्यात लोळणारे ]
जगाची जाणीव होईपर्यंत माणूस स्वतःच्या कोशात निमग्न असतो. निसर्गाक्रमाविरुद्ध चिकार काळपर्यंत त्याचं पालनपोषण परहस्ते होत असतं. स्वतः त्या लायक बनायला जर पहिली कुठली गोष्ट करावी लागत असेल तर ती आहे - स्वतःच्या कोशातून बाहेर येणे, विश्वाला सामोरं जाणं - विठ्ठलराव तेच बजावतात.
दुसरी गोष्ट - जुळवून घेणं. जगाला सामोरे गेलात की तुमच्या खूप दिवसांत कोशात साचलेल्या संकल्पना आणि समोर दिसणारं जग यात अंतर पडलेलं दिसतं - ते मिटवायची जबाबदारी तुमची. माझ्या तंबूतील सहकाऱ्यांच्या शब्दात सांगायचं तर " लाज सोडा". ही लाज असते स्वतःची, आपल्या आतापावेतो परखल्या न गेलेल्या क्षमतांची, बुद्धीची, भावभावनांची - त्यांचे बंध उलगडा. त्यांची झेप असेल तितक्याच त्या जातीलही पण झेप किती आहे हे 'लाज' सोडल्याशिवाय कसं कळणार? म्हणून विठोबा म्हणतो, 'जीवनाशी जुळवून घ्या ते स्वतःला ओळखण्यासाठी. प्रवाहाबरोबर वाहायचं का विरुद्ध हा पुढचा प्रश्न आहे.
विठोबाचे इतर बोल पुढे..

वारी नेमकी कशी असते ? कल्पना करा, तुम्ही सी.एस.टी. किंवा चर्चगेट किंवा तत्सम लांब फलाटाच्या एका टोकाला गाडीतून उतरलात आणि समोरच्या गर्दीबरोबर पुढे चालायला लागलात... समजा फलाट संपावा तिकडे न संपता वाढत वाढत दोन-अडीचशे किलोमीटर लांब झाला तर कसं वाटेल?
फारच रुक्ष वर्णन झालं का? हो, खऱ्या वारीत यातल्या अनेक गोष्टी नसतात पण लांब चालायचा (गर्दीबरोबर) मार्ग मात्र असतो. डोक्यावर असतं मोकळं आकाश, आजूबाजूला शेतं.. हे सगळं 'सूत्र'मय पद्धतीनेच सांगायला हवं -
तर तुम्ही आळंदी - पंढरपूर भक्तीच्या मेगा हायवेवर आलात. रस्त्याच्या उजवीकडल्या अर्ध्या भागात वाहनांची रांग असते. single lane, कोणीही सहसा overtake करत नाही. यात पाण्याचे टँकर असतात, इतर फुटकळ विक्रेत्यांच्या गाड्या व चहाच्या ठेल्यांपासून मुख्य म्हणजे दिंड्यांचे ट्रक असतात. एकेका दिंडीचा जामानिमा तीस-चाळीस वाहनांत पुरत नाही!

राहिलेला डावीकडला अर्धा भाग केवळ माणसांसाठी. यातही तीन lanes असतात. मध्यभागातून दिंड्या त्यांच्या नंबराप्रमाणे चालत असतात. त्यांना अधनंमधनं 'क्रॉस' करायची अजिबात परवानगी नाही. प्रत्येक दिंडीच्या शेवटी वीणेकरी असतो, त्याच्यामागे दिंडीतल्या स्त्रिया असतात. दिंडीच्या सुरुवातीला पताका (अर्थात ध्वज) असतात. जर दिंडी ओलांडायची असेल तर या पताकांच्या पुढूनच, अन्यथा नाही! ही नियमावली अलिखित आहे, पण काटेकोरपणे पाळली जाते.
माणसांच्या या मुख्य प्रवाहाच्या उजव्या व डाव्या बाजूने free lanes असतात. पुढे जाऊ इच्छिणाऱ्यांनी तिथून बिनदिक्कत पुढे जावं.
(Insert Image)
दिंड्यांना नंबर असतात, उदा. रथामागे ४३ किंवा रथापुढे ३ वगैरे. ही मागे-पुढेची भानगड मला बागल महाराजांनी समजावून सांगितली. बागल महाराज मुंबईच्या ग्रूपचे. त्यांच्या तंबूत मी पहिल्या दिवशी (किंवा) रात्री राहिलो. वारीची basic तत्त्वं समजावून सांगणारे ते पहिले गुरुदेव! वारी सुरू असताना माऊलीचा रथ [माऊली = ज्ञानेश्वरमहाराज] मधे असतो. त्याच्या दुतर्फा - पुढे व मागे, सगळ्या दिंड्या असतात. नंबरप्राप्त दिंड्या म्हणजे जरा व्यवस्थित मोठ्या - आकाराने, वारकरी संख्येने.. [आमच्या दिंडीत जवळजवळ ५००० लोक होते] याशिवाय जे 'किडुक-मिडुक' गट असतात ते या नंबरांच्या नंतर चालतात ते 'बिननंबराच्या दिंड्या' या शीर्षकाखाली. त्यांची संख्या वाढली की/ तर ते माऊलीकडे नंबराकरता 'अप्लाय' करू शकतात.
९५ - ९४ - ...३-२-१- माऊली - १-२-३-...-९४
त्यामुळे एवंगुणविशिष्ट दिंडी चालू लागली की मोठी मौज येते - ती याकरता -
(Insert Image) फलटण ------माऊली------ बरड [पुढला मुक्काम]
सकाळी सात-सव्वासातच्या सुमाराला शेवटली दिंडी फलटण सोडत आहे असं वाटेपर्यंत पहिली दिंडी पुढल्या मुक्कामाच्या दिशेने पाच-सहा किलोमीटरवर पोचलेली असते.
'वारीचं पुढलं टोक, मागलं टोक' अशी 'सूत्र'मय भाषा वारकऱ्यांच्या तोंडी येते ती याचमुळे!
आळंदीहून निघालेल्या सूत्राचा वाखरीपर्यंत जाड दोरखंड होतो!!
आता वारीत येऊ इच्छिणाऱ्याला आलाच पाहिजे असा कळीचा शब्द - एकच - 'माऊली'!!!
सर्वाभूती परमात्मा पाहणे वगैरे आध्यात्मिक कल्पना ही कविकल्पनाच वाटते; पण applied आध्यात्म पाहायचं तर वारीत या!
संबोधन विभक्तीचा एकच प्रत्यय असतो - माऊली!

अहो, अरे, अगं, साहेब, भाऊ, काका, मामा पासून ए पानवाल्या, चहावाल्या, हॉटेलवाल्या या सगळ्यांना एकच संबोधन पुरतं - माऊली.
माऊलीचा विषय निघालाच आहे तर सांगतो - विठोबा काय, ज्ञानोबा काय, इथला भक्ताचा देवाकरता भाव लेकराचा असतो. मागे म्हटलेल्या 'पालक' इमेजशी हे आई-मुलाचं नातं योग्य मेळ खातं. मातृप्रेम, वात्सल्य या गोष्टी ज्यांना अधिक प्रिय आहेत, अधिक भावतात, त्यांना वारीत अधिक बरे वाटते.
म्हणूनच की काय, व्यवहारी जगातल्या 'मायबाप' सरकारला वारकऱ्यांची चोख व्यवस्था ठेवायला लागते - आणि ते ठेवतातही! या वर्षी काय, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री - दोघे सोलापूरचे! मग काय म्हणून बडदास्त होती सांगू? बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल!
वारीतला सर्वसाधारण दिनक्रम असाः पहाटे तीनच्या सुमारास उठणे; कारण आपण झोपतो ते तंबू व आपल्या सोबतचं बिछाना वगैरे सामान [ज्याला 'गबाळं' असं सुंदर नाव आहे] घेऊन पुढे जाणारे ट्रक दिंडी निघायच्या आधी किमान दोन तास रवाना करायचे असतात. ज्यामुळे ते वेळेत पोचून पुन्हा उस्कटायला मिळतात. तर तीनच्या सुमारास लाऊड-स्पीकरच खणखणायला लागतो. तोंड धुवायचं, तंबू आधी गुंडाळून ट्रकात टाकायचा. त्या दिवसाचे तेवढे कपडे व खायचे पदार्थ जवळच्या पिशवीत घेऊन ठेवायचे आणि बाकीचं गबाळं टेंपोत टाकायचं. परसाकडे जाऊन आलं तर फारच उत्तम; अंधार असतो, 'नागर' मनाला तेवढं बरं वाटतं! मग टँकरच्या नळाखाली 'आंघोळ' वगैरे पूर्णपणे ऐच्छिक! एक-दोन दिवस अशी आंघोळ केल्यानंतर कळलं की साबणाचं पौराणिक नाव 'उद्वर्तन' हे सर्वार्थाने योग्य आहे.  पूजेत देवाला अभिषेक उर्फ आंघोळ घातल्यानंतर गंध, अत्तर आदींसारखाच सुगंधी द्रव्ये - 'उद्वर्तने' यांचा उल्लेख असतो. खऱ्या आंघोळीला स्वतः हाताने खसखसून साफ करण्यापरीस जास्त काही लागत नाही. बाकीच्या गोष्टी उपचार! आहे त्यास अधिक चांगले करण्यासाठी..
अशा आंघोळी-पांघोळी उरकल्या, कपडे धुतले की [कपड्यांच्या 'धुण्या'बद्दलही प्रत्येकाच्या कल्पनेला मुक्त वाव आहे; जसं की 'पाणी दाखवणे' पासून पुढे काहीही.. ] रोजचा 'नेम' करावा, म्हणजे तुम्ही देवाचं रोज जे काही म्हणत असाल ते.
साधारण सात-साडेसातच्या सुमारास दिंडी निघते. आपापल्या नंबरानुसार वारकरी सामील होतात. दिंडीत शिरताना जमिनीला - रस्त्याला नमस्कार करून प्रवेश करण्याची प्रथा आहे - रंगभूमीची आठवण आली; स्टेजवर जाताना हीच प्रथा असते.
साधारण तास-सव्वा तासाने पहिली विश्रांती होते. थोडंफार खाल्लं की थोड्याश्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरुवात. मग मुक्काम थेट जेवायच्या ठिकाणी. साधारण साडेअकराच्या सुमारास हा मुक्काम येतो. जेवण झालं की सरळ एखाद्या झाडाची सावली बघायची आणि आडवं व्हायचं - जेवल्यानंतर लगेच चालायचं नाही. दिंडीचा मार्ग जिथून जातो त्या सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यातलं भर दुपारचं ऊन झाडाखाली बसून नव्हे तर झोपून पाहण्यातच मजा आहे.
दोनच्या आसपास परत वाटचाल सुरू होते. चार वाजायच्या पुढे-मागे एक 'ब्रेक' - त्या लहानश्या ब्रेकनंतर शेवटला टप्पा - पुढला मुक्काम. यातील सगळ्या वेळी नंबरांची रांग विस्कटते व परत सांधली जाते पण दर वेळी चालताना आहे तोच क्रम राखला जातो ही फार मौजेची बाब आहे!
मुक्कामास पोचल्यावर तिथे ठोकलेले आपापले तंबू शोधून आपापली गबाळी टेंपोतून काढून नव्या मुक्कामी स्थिरस्थावर व्हायचं; आजूबाजूच्या परिसराची व विशेषतः 'परसा'ची ओळख करून घ्यायची.
तोवर 'सत्संगा'ची वेळ होते. सात-साडेसातला उपस्थितांपैकी कोणी ना कोणी अधिकारी व्यक्ती तासभर निरुपण करते. भाषा अतिशय साधी व सोपी असते; परिणाम करणारी असते. उदा. पैशामुळे माणसाचं समाजातलं स्थान कसं ठरतं वा बदलतं यावर सांगितलेल्या एका अशाच गोष्टीची catch line आठवतेय - "पैसा तेरे तीन नाम, पर्श्या, परशू, परशुराम! " - एका पर्श्या नावाच्या गरीब माणसाकडे जसा पैसा येत जातो, त्यासरशी लोक त्याला परशू व अखेर मोठा 'शेठ' बनल्यावर परशुराम म्हणायला लागतात, असा काहीसा मासला होता. पर्श्या, परशू व परशुराम या तीन संबोधनातला फरक 'नाम'धारी व्यक्तीकडील पैसा, पत यावर ठरतो हे इंगित!
साधारण साडेआठपर्यंत जेवणाच्या पंगती बसतात. इतक्या अजस्त्र पंगती मी आजवर बघितल्या नव्हत्या. मुक्कामाची जागा बहुधा एखादा मोकळा माळ, शेत, एखाद्या साखर कारखान्याचे आवार अशी असते. त्यावर जेवायला बसलेल्या लांबच्या लांब रांगा, त्यांच्याकरता रांधलेलं अन्न आणि 'वाढ' करणारे 'अनवाणी' बहाद्दर - साराच धन्य प्रकार! जेवायला सुरुवात होण्यापूर्वी जेवणाची व्यवस्था करणाऱ्यांचा [म्हणजे त्या दिवशीच्या जेवणाकरता ज्यांनी आर्थिक/प्रत्यक्ष मदत दिली आहे] उच्चार व उपलब्ध असल्यास सत्कार होतो. वाढपाचं काम वारकऱ्यांत तंबूनिहाय विभागून दिलेलं असतं. लाऊडस्पीकरवरून वाढणाऱ्यांना सतत मार्गदर्शन सुरू असतं.
मग कधी-कधी भजन असतं [मुक्काम एकाहून जास्त दिवस असतो तेव्हा..] अन्यथा मंडळी तंबूत परततात. प्रत्येक तंबूत हरिपाठ होतो आणि गुडघ्यांना तेल चोळत मंडळी पथारीवर पाठ टेकतात..
अर्थात आधी म्हटल्याप्रमाणं हा सर्वसाधारण दिनक्रम आहे. वारकऱ्यांना चालणे सुरू करण्यास वा थांबण्यास पूर्ण मोकळीक असते. पहाटे तिनाला तंबू आवरणं व रात्रीच्या मुक्कामाला वेळेत पोचणं इतकं पाळलं की झालं.
वारीचा चालण्याचा वेग काय असतो हे कुतूहल मला होतं. वारीला स्वतःची गती असते पण तिला कोणताही बांधीव वेग/नियम नसतो. एखाद्या दिंडीचं एखादं भजन रंगलं तर मागला प्रवाह थांबतो; मग भजन संपलं की दिंडी आपल्या पुढे असलेल्या मंडळींना गाठायला जवळजवळ धावू लागतात - त्यांच्या मागून सारा प्रवाहही.. आणि एकदा का पुढली मंडळी भेटली की पायांना करकचून ब्रेक लागतात - सगळ्यांच्याच. दिंडीबरोबर चालायचं तंत्र जमायला थोडा वेळ लागतो. NCC किंवा तत्सम कवायतीत चालल्यासारखंच असतं. फक्त क्षणाक्षणाला adjust करावं लागतं. नाही म्हणजे मागच्या-पुढच्याला पाय लागतात.
विठोबाचा पुढला धडा : हर घडी adjustment! प्रवाहाचा भाग बनल्यानंतर प्रतिक्षण त्याच्या कलाने राहावं लागतं; वेगळ्या भाषेत 'प्रवाहाची नस पकडली की स्वतःच्या हालचालींकडे निराळं लक्ष द्यावं लागत नाही.'
रंगलेल्या मैफलीचा आस्वाद घ्यायला दर वेळी बैठक लागत नाही. वारीतली मैफल प्रवाही असते; मनुष्यास एकाच वेळी तिच्यात भागही घेता येतो व तिचा आनंदही. वारीत गायली जाणारी भजनं हाच वारीचा आत्मा म्हणता येईल. चाली तर इतक्या निरनिराळ्या की एक संपून दुसरं भजन/अभंग चालू झाला की मागचा विसरायला होतो. बरं इथली म्हणायची पद्धतही निराळी.
उदा. ज्ञानियांचा राजा गुरू महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायीची वहाण पायी बरी ॥२॥
ब्रह्मादिक जेथे तुम्हा वोळगणे । इतर तुळणे काय पुरे ॥३॥
तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली । म्हणोनि ठेविली पायी डोई ॥४॥
हा अभंग म्हणायला घेतला तर ध्रुवपद असणार : मज पामरा हे काय थोरपण ।
तिसऱ्या चरणापर्यंत त्याच चालीत म्हणणार व 'तुका म्हणे.. ॥४॥ ला एकदम निराळी चाल आणि त्याच चालीत समेवर येणार ते 'मज पामरा .. ' यावर!
मृदंग या प्रकाराची बातच काही न्यारी. त्याच्यावर थाप पडली की त्या ठेक्याची नशा चढायला अजिबात वेळ लागत नाही. या माहोलात आलेल्या नास्तिकातल्या नास्तिक मराठी मनाला त्याची भूल पडणारच.
इथे लोकप्रिय चालींच्या उलटसुलट प्रवासाबद्दल सांगायला हवं.
असं म्हणतात की रामचंद्र चितळकर [तथा सी. रामचंद्र] चाली सुचत नसल्या की वारीत एक चक्कर टाकून येत.. [उदा. दत्ता दिगंबरा या हो, स्वामी मला भेट द्या हो --- कितना बदल गया इन्सान वगैरे ]
हिंदी, मराठी चित्रपटसृष्टी व त्या आधीची नाटकं यांतील संगीत यांचं माझ्या मते दुहेरी नातं आहे. दिंडीत चाललेली भजनं ऐकून त्यावर आधारित प्रसिद्ध नाट्यगीतं/ भावगीतं/ चित्रपटगीतं शोधून काढणं हा न संपणारा खेळ आहे. अर्थात याला दुसरा पदरही आहे. 'हिट' झालेली चित्रपटगीतं अभंगांचा, भजनांचा साज बनतात! पण दिंडीतले सत्तरी ओलांडलेले वारकरी कालच्या गाण्यांची नक्कल करतील का लहानपणापासून ऐकत आलेल्या चाली म्हणतील हा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि या चालींचा एक गमतीदार प्रवास बघायला मिळाला -
इथल्या मूळच्या चालींना प्रमाण मानून कोणी प्रतिभाशाली संगीतकार संगीतरचना करतो. ती रचना अतिशय लोकप्रिय होते - इतकी की त्यावर आधारित देवस्तुती/आरत्या/भजनं यांच्या कॅसेट्स आसमंत दुमदुमून टाकतात. वारीत कधी कधी या 'पिढी'चं अंतर असलेल्या चालींची भेट घडतेच!!
'जगाला फुलवायचं, चालवायचं सामर्थ्य आहे खरं!'
एका परीनं हे महाराष्ट्रीय संमेलनच म्हणायचं. ओळख-पाळख काहीही लागत नाही. "काय माऊली कुठली म्हणायची? " इतकं पुरे. जळगाव, धुळे, औरंगाबाद, नागपूर पासून उस्मानाबाद, लातूर, कोल्हापूर, नगर, नाशिक, मुंबई.. सगळीकडले प्रतिनिधी असतात. वर्षानुवर्षे न बोलावता येतात, हक्कानं येतात, तीन आठवडे मांडीला मांडी लावून बसतात, सोबत चालतात. मी महाडकडले तीन-चार संन्यस्तही पाहिले. दुपारच्या वेळी असाच (भोजनोत्तर) पडलेलो असताना त्यांचा वाद ऐकला. ते निर्गुणी संप्रदायातले/निवृत्तीमार्गी वाटत होते. मोठ्या हिरिरीने आपली मतं मांडत होते. नामसंकीर्तन, सगुणोपासना निरर्थक आहे, सगुण-साकार रुपाची आराधना काय कामाची; परमेश्वर तर निर्गुण, निराकार आहे असा काहीसा त्यांचा पक्ष होता. त्यावर मी त्यांना 'कॉपीबुक' उत्तर सुनावलं - 'दुसऱ्या दिवशी रांगोळी पुसायची असली म्हणून कुठलीही गृहिणी आजची रांगोळी कशीतरी काढत नाही; मेहनतीने सुबक, सुंदरच काढते'.. पण त्यांना काही विशेष पटलं नाही...
.. तरीही ते वारीसोबतच होते.
'जात नाही ती जात' म्हणतात ते खोटं नसावं. पूर्वीच्या काळी प्रत्येक जातीची खाण्या-जेवण्याची व्यवस्था वेगळी-वेगळी असायची. आजमितीला असं काही दिसलं नाही; पण दुसऱ्या जातीच्या माणसाकडे पाहतानाचा 'आप-पर' भाव सहज ओळखता येतो. म्हणजे माझी ओळख करून देताना - 'हे चिंतामणी जोग; पहिल्यांदाच वारीला आले आहेत- ब्राह्मण समाजाचे आहेत... ' वारीला आल्याबद्दल कौतुक आहे, आपुलकीही आहे; पण थोडासा परकेपणाही आहे. पुढल्या गप्पांमध्ये सहजच तुकारामांचे उल्लेख येतात - त्यांचा ब्राह्मणांनी केलेला छळ, त्यांचे कट्टर विरोधक व नंतरचे निःस्सीम भक्त- रामेश्वरभट्ट.. मग विष्णूबुवा ब्रह्मचारींचा किस्सा येतो, मामासाहेब दांडेकर, त्यांचं अफाट कार्य - या सगळ्यातून कौतुकाची पावती मिळते पण का कोण जाणे वेगळेपणाचा धूप दरवळत राहतो खरा.
जातींची उच्चनीचता ही भानगड कधी उगवली ते ठाऊक नाही पण माणसाची 'वेगळे ओळखले जाण्याची ओढ' हे या संस्थेच्या फोफावण्याचे एक कारण असावे. संस्कृती रुजते ती सवयींमुळे. जितकं वैविध्य सवयींमध्ये तितकं त्या-त्या जातीतले वेगळेपण अधिक - आणि ते वेगळेपण जपण्याची इच्छाही तीव्र.
मात्र समर्थ रामदास आता परके नाहीत. रोज जेवायला बसल्यावर खणखणीत आवाजात 'सदा सर्वदा.. ' चा घोष व्हायचा.
'सुशिक्षितपणा'चा - सुशिक्षित असल्यामुळे आलेला हा एक वेगळा अनुभव - भंडी-शेगाव या गावी मुक्कामाला पोचलो. उतरायची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात होती. तंबू वगैरे ठोकून तयार होता; पण दुर्दैवाने दुपारपासून तिथं पाऊस लागला. तंबूभोवती चर वगैरे खणले नव्हते त्यामुळे पाणी आत शिरलं आणि झोपायचं कुठं हा प्रश्न आमच्यापुढे पडला. तंबू जागचा हलवून पुन्हा दुसरीकडे लावणं काही शक्य नव्हतं शाळेची इमारत एकमजलीच पण विस्तीर्ण होती. इतर काही दिंड्यांची व्यवस्था शाळेच्या वर्गांत (आधीपासून) ठरल्याप्रमाणे केली होती. दुपारी चार-साडेचारपासून व्हरांड्यातल्या मोकळ्या जागांवरही लोकांनी पथारी टाकण्यास सुरुवात केली. आमच्या तंबूत पर्यायी व्यवस्थेचा शोध सुरू असताना आमच्यातले दोघे-तिघे जिन्याच्या व भिंतीच्या मधील बोळकंडीत सगळ्यांच्या हातपिशव्या घेऊन बसले होते.
बहुधा ट्रकमध्ये आणि त्या बोळकंडीत झोपायला लागणार असा रंग दिसत असताना तिकडले एक गृहस्थ आम्हाला 'किती माणसे आहात' असं विचारू लागले. ते शाळेची व्यवस्था पाहणारेच होते. आमची परिस्थिती त्यांनी पाहिली. शाळेची बंद स्टाफरुम त्यांनी उघडून झाडून-बिडून आतल्या गाद्या-गिर्द्यांसह आम्हाला देऊ केली - का? तर केवळ आम्ही पुण्या-मुंबईकडचे सुशिक्षित लोक दिसतो - खोली दिली तर खराब करणार नाही म्हणून.. [अर्थातच त्यांचा हा विश्वास आम्ही सार्थ ठरवला] आंधळा मागतो एक डोळा आणि देवाने दिव्यदृष्टी द्यावी तशी आमची अवस्था झाली. आमची सोय झाल्याने आम्ही सामान-सुमान उचलतोय तोच कोणीतरी वारकऱ्यांनी त्या जिन्याच्या बोळकंडीची जागा आमच्याकरता ठेवा; आमची माणसं आणतो असा आग्रह धरला. त्यांनी त्या जागी त्यांच्या पथाऱ्या पसरल्या, आमचे आभार मानले पण मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. स्टाफरूमपर्यंत जाईस्तो जागोजाग सगळ्या वयाचे बायका, पुरुष, मुलं व्हरांड्यात पथाऱ्या टाकून बसले होते... आणि आम्ही 'स्पेशल' खोलीत पंख्याखाली असलेल्या गाद्यांवर झोपायला चाललेलो - का? आम्ही 'सुशिक्षित' आहोत म्हणून.. त्या खोलीत गादीवर पडणे मला शक्यच नव्हते. बाजूला सतरंजीवर अंग टाकत मी विचार करत पडलो - म्हटलं तर साधी गोष्ट. आजूबाजूला शेकडो लोक कसेतरी पहुडलेत मग आपलेच हे 'लाड' का? की आपल्या तरुणाईच्या रक्तामुळे या गोष्टीचा त्रास होतोय?
इथं आमच्या दिंडीच्या संचालकांबद्दल सांगणं आवश्यक आहे. हरिभक्तपरायण गोविंदमहाराज केंद्रे हे आमच्या दिंडीचे संचालक. दिंडीच्या जबाबदारीची धुरा लीलया सांभाळतात. त्याहून विशेष म्हणजे अत्यंत निगर्वी व कोणताही बडेजाव नसणारे! दिंडीतल्या प्रत्येक माणसाला 'आपला' समजून त्याप्रमाणे वागणारे. रोज दोन्ही जेवणांच्या वेळी (दुपार व रात्र) जातीने उभे राहून काय हवं नको ते संपूर्ण दोन-तीन पंगती उठेस्तो पाहत होते.
वाखरीच्या आधी जगप्रसिद्ध 'उभं रिंगण' असतं. ते पाहायला गेलो. प्रचंड मोकळ्या माळावर दोन्ही बाजूंनी गर्दी असते; मधून माऊलीचा अश्व दौडत जातो वगैरे ऐकलं होतं. म्हणून त्या अतिविस्तीर्ण माळावर जाऊ लागलो तो काय..
नुकताच पाऊस पडून गेल्याने सबंध शिवारातल्या भुसभुशीत मातीचा चिखल झाला होता. या चिखलाची अडचण म्हणजे पायताणाला इतका चिखल लागतो की चालणंच काय पण ठेवलेला पाय उचलणंही मुष्कील होतं. थोडा वेळ सर्कस केली [चिखलाने उंच झालेल्या पायांनी चालायची ] मग नाद सोडला..
वाखरीच्या मुक्कामाचाही पावसाने बोऱ्या वाजवला.मग तसेच रात्री निघालो [म्हणजे आमच्या तंबूतले दहा-पंधरा जण], नवमीच्या रात्रीच पंढरपूरला केंद्रे महाराजांच्या मठात पोचलो. रात्रीचे साडेबारा वाजत होते.
दशमीची सकाळ उजाडली आणि पंढरपूर नावाच्या शहराच्या मर्यादा जाणवू लागल्या. दिंडी वाहती असते. मुक्कामाच्या ठिकाणी एखाद-दोन दिवसच थांबते; मुक्काम उठला की त्या जागेशी काहीही संबंध उरत नाही. पण पंढरीत मात्र किमान पाच दिवस प्रचंड जनसमुदाय [७-८ लाख] सतत येत-जात असतो - राहत असतो. नागरी सुविधांवर ताण पडला नाही तरच नवल. परिणामी देवळाचा भाग सोडता इतर सगळा भाग बकाल दिसतो. तेथील मठ, शासन सगळे आपापल्या परीने गैरसोय कमीत कमी होईल याकरता प्रयत्न करताना दिसतात; पण आधी म्हटल्याप्रमाणे लोकांचा प्रपात इतक्या वेगाने येत असतो की त्यापुढे सगळया प्रयत्नांची 'लव्हाळी' होते.
दर्शनाची रांग हा तर मारुतीच्या शेपटाहून लांब प्रकार. मुख-दर्शन, संपूर्ण दर्शन असे त्यातही प्रकार असतात. दिवस, रात्र, २४-३६... तास लोक उभे असतात. केवळ कळसच पाहायचा असं मी आधीच ठरवलं होतं - रांगेचं दिव्य व्यक्तिशः झेपत नाही आणि पटतही नाही.
अशीच आणखी एक न पटलेली गोष्ट म्हणजे दंडवत. दुसऱ्या वारकऱ्यास भेटताना/ निरोप घेताना समोरच्या व्यक्तीच्या पायावर डोकं टेकायचं; चरणस्पर्श करायचा आणि त्यांचे पाय हाताने चेपून अल्पशी सेवा करायची. असं प्रत्येकजण करतो; वय वगैरेचा काहीही मुलाहिजा बाळगायचा नाही. आता समोरच्या व्यक्तीस आदरपूर्वक नमस्कार ठीक आहे, चरणस्पर्शही ठीक; पण प्रत्येकाच्या चरणी डोकं टेकणं वगैरे काही पटत नाही. इतका नम्र भाव कुणाच्या बरं अंगी असतो? पण म्हणून उगाचच डोकी टेकून नम्रता अंगी येईल अशी अपेक्षा का करायची? असो..
कळस पाहिला, मागे फिरलो, दशमीला रात्रीच घरी पोचलो. दुसऱ्या दिवशी T.V. वरच विठोबाला पाहिलं. T.V. बंद केला - आरशात पाहिलं. विठोबानं त्याच्या परिवारात सामील करून घेतल्याची पोच दिली होती - सूर्यनारायणाच्या माध्यमातून आपल्या सावळ्या रंगात त्यानं मलाही रंगवलं होतं...
(पूर्व-प्रकाशित)

1 comment:

  1. चिंतामणी,

    नमवलंस मित्रा ! इतकं छान, रसमय 'सुसूत्र' वर्णन वारीचं, जी मला करता येणं अंमळ कठीणच आहे ..(I suffer from a physical challenge ), मला ती तू घडवलीस.

    नव्हाळ तरुणाईच्या दृष्टीकोनातून चितारलेलं हे वारीचं महाचित्र माझ्या व्यक्तिगत आर्ट गॅलरीत दिमाखाने मिरवेल..


    भारती.

    ReplyDelete